पृष्ठे

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

त्याला इलाज नाही

त्याला इलाज नाही

धिक्कारिली तरीही सटवीस लाज नाही;
श्रद्धा न पाठ सोडी, त्याला इलाज नाही.
देवांतुनी जगाला ज्याने विमुक्त केलें
त्यालाच देव करिती! त्याला इलाज नाही.
लढवून बांधवांना संहार साधणारा
गीता खुशाल सांगे! त्याला इलाज नाही.
तत्वज्ञ आणि द्रष्टे खंडून एकमेकां
कथिती विरुद्ध गोष्टी; त्याला इलाज नाही.
तें भूत संशयाचें ग्रासून निश्चितीला
छळतें भल्याभल्यांना; त्याला इलाज नाही.
विज्ञान ज्ञान देई; निर्मी नवीन किमया;
निर्मी न प्रेम, शांती: त्याला इलाज नाही.
बुरख्यांत संस्कृतीच्या आहे पशू दडून;
प्रगटे अनेक रूपें! त्याला इलाज नाही.
असतो अशा जिवाला तो ध्यास मूल्यवेधी!
अस्वस्थता टळेना; त्याला इलाज नाही.
ज्यांना अनेक छिद्रें असल्याच सर्व नावा;
निर्दोष ना सुकाणू; त्याला इलाज नाही.
वृद्धापकाल येतां जाणार तोल थोडा;
श्रद्धा बनेल काठी! त्याला इलाज नाही.
               -विंदा करंदीकर
(मौज: १९९९)
("जातक" काव्यसंग्रहातून साभार)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा